अल निनोचा प्रभाव; यंदा मॉन्सूनमध्ये खंडाची शक्यता – शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल शेतीकडे वळावे
बीड : यावर्षी El Niño या प्रशांत महासागरातील गरम पाण्याच्या प्रवाहामुळे मॉन्सून पावसात अनियमितता आणि दीर्घ खंड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी हवामान अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानातही शेती टिकवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रकल्पाद्वारे शेती शाळा, आधुनिक तंत्रज्ञान, तसेच अनुदानावर कृषी यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत.
विशेषतः सोयाबीन, कपाशी व तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी बीबीएफ (BBF – Broad Bed Furrow) पद्धतीने पेरणी करण्यावर भर द्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. गादीवाफ्यावर पेरणी केल्यास पावसात खंड पडल्यासही जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि पिकांचे नुकसान कमी होते.
शेतकऱ्यांनी बीबीएफ मशीन खरेदीसाठी महाडीबीटी तसेच नानाजी देशमुख प्रकल्पांतर्गत अर्ज करावेत. तसेच अवजारे बँकेच्या माध्यमातूनही या यंत्राचा लाभ घेता येणार आहे.
यासाठी शेतकरी गट, महिला बचत गट यांनी पुढाकार घेतल्यास गावागावात या यंत्राचा वापर वाढेल व हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होईल.
“यंदा हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

