📍 पुणे | प्रतिनिधी
पुणे येथील सामाजिक न्याय भवन, मध्यवर्ती कार्यालय येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांची भेट घेऊन ऊसतोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नुकताच त्यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
राज्य शासनाने सन २०२२ मध्ये ऊसतोडणी कामगारांसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली असून या महामंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
बैठकीत ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे, कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा व वसतिगृह उपलब्ध करून देणे, अपघाती विमा योजना राबविणे, तसेच गळीत हंगामात कामगारांच्या बैलांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान देणे यांसारख्या महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.
तसेच महिला ऊसतोडणी कामगारांसाठी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे, गर्भधारणेच्या काळात सकस आहार देणे तसेच गळीत हंगामाच्या काळात सेंट्रलाइज किचनच्या माध्यमातून मजुरांना सकाळचा जेवणाचा डबा उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
मागील दोन ते तीन वर्षांत बीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोडणी कामगार गळीत हंगामासाठी इतर जिल्ह्यांमध्ये गेले असताना त्यांच्या बैलांचे अपघाती मृत्यू व अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र संबंधित कामगारांना अद्याप विमा व सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
तसेच कारखाना परिसरात किंवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झालेल्या ५० हून अधिक कामगारांच्या कुटुंबियांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याबाबत चर्चा करून त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय मागील दोन ते तीन वर्षांत या महामंडळाच्या माध्यमातून वसतिगृह बांधकाम, मध्यवर्ती कार्यालय, विभागीय कार्यालयांची दुरुस्ती, पाणी फिल्टर, ओळखपत्र वितरण तसेच “आनंदाचा शिधा” वाटप यांसारख्या विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. या कामांची सद्यस्थिती काय आहे, ती प्रत्यक्षात सुरू आहेत का याबाबतही विचारणा करण्यात आली.
या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी पुढील काळात ऊसतोडणी कामगारांसाठी पथदर्शी योजना प्रभावीपणे राबविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कामगार मंडळाचे केंद्रे साहेब तसेच ऊसतोडणी कामगारांच्या अपघात विमा व वैद्यकीय उपचारासाठी सक्रिय असलेले बीड येथील श्री. बबन माने उपस्थित होते.
📰 BBL DIGITAL NEWS
✍️ भाऊसाहेब बाबासाहेब लवटे
मुख्य संपादक

